प्रधानमंत्र्यांच्या हस्ते माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचे प्रकाशन

 अहमदनगर, दि.13 (जिमाका वृत्तसेवा) : माजी खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटील यांनी राजकारणाला समाजबदलाचे माध्यम मानून काम केले. त्यांनी ग्रामविकास, सहकार, सिंचन आणि शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम केले आहे. सहकार चळवळीला त्यांनी वेगळा आयाम दिला, अशी भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
स्वत:तील साधेपणा जपत परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य आणि ती बदलवण्याचा खंबीरपणा बाळासाहेब विखे-पाटील यांनी दाखविला. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी दिलेला वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला आणि कष्टकरी, शेतकऱ्यांच्या मनात स्वत:चं स्थान निर्मांण केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

 

प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी लिहिलेल्या राजहंस प्रकाशनच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तार समारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे मुंबईहून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे चेअरमन व कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र विखे आदी उपस्थित होते.


यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी आणि मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव त्यांच्या मनोगतातून केला.

 

प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले, बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र जरी आता प्रकाशित झाले असले तरी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर, केंद्रीय मंत्रीपद सांभाळताना त्यांनी केलेल्या कामामुळे देशभरात ही ओळख अधोरेखित झाली. राजकारणाला समाज बदलाचे माध्यम मानून त्यांनी काम केले. सहकार क्षेत्र, सिंचन क्षेत्रात त्यांनी केलेले काम इतरांना प्रेरणा देणारे आहे. पाणीप्रश्नावर त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करण्याचे काम केले. सहकार चळवळ ही कोण्या एका जातीपातीपुरती मर्यादित नसून ती सर्वसमावेशक आहे, असे मानून त्यांनी सर्वांना प्रतिनिधीत्व दिले, असे ते म्हणाले.

 

ज्यावेळी ग्रामीण भागातील शिक्षणाची देशात चर्चा होत नव्हती, त्यावेळी त्यांनी लोणीसारख्या ठिकाणी प्रवरा शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शिक्षणास प्रोत्साहन दिले. कौशल्याधारित शेतीचा आग्रह धरला, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

 

आज शेती  क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्याचा तुटवडा सहन करणारा देश आज शेतकऱ्यांच्या प्रयत्नांनी अन्नधान्यांत स्वयंपूर्ण बनला आहे. त्यांच्या शेतमालाला किफायतशीर भाव देण्याचा प्रयत्न होत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न होत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून काम होत असल्याचे  पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मनोगतातून स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे पाटील घराणे हे अनेक अडचणींवर मात करुन पुढे आलेले घराणे आहे. अनेकजण परिस्थितीला शरण जातात. मात्र, विखे पाटील यांनी परिस्थितीला तोंड देत ती बदलवण्याचे सामर्थ्य दाखविले. ‘देह वेचावा कारणी’ हे आत्मचरित्र म्हणजे बाळासाहेबांनी केलेल्या कामाचा, त्यासंदर्भातील आठवणींचा पटच आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

शेतकऱ्यांची संस्था ही काचेचं भांडं आहे आणि आपण त्याचे विश्वस्त आहोत, या भावनेतून त्यांनी काम केले. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी घालून दिलेला काटेकोरपणाचा, शिस्तीचा, साधेपणाचा आदर्श त्यांनी कायम ठेवला, असे सांगत विखे पाटील घराण्याविषयी प्रेम, आपुलकी ही पहिल्यापासूनच आहे आणि ती कायम राहील, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे आणि विखे घराण्यातील नात्यालाही उजाळा दिला.

 

विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रास्ताविकात आत्मचरित्र प्रकाशन आणि संस्था नामविस्ताराबाबत माहिती दिली. खासदार. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर आभार डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने