पुनर्वसितांसाठी नागरी सुविधांची कामे तत्काळ पूर्ण करा – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 अमरावती, दि. १२ : प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना नागरी सुविधांची कामे निकृष्ट झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अशी निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदाराला तत्काळ ब्लॅकलिस्ट करावे,  अधिकाऱ्यांनी याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांचे म्हणणे जाणून घेऊन प्रलंबित कामे पूर्णत्वास न्यावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. यानंतर आपण स्वतःही या कामांची पाहणी करणार असून, कुठेही अपूर्ण कामे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्त पुनर्वसन आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार  बळवंतराव वानखडे, आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जि प माजी सभापती जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त प्रमोद देशमुख, रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी राम लंके आदी उपस्थित होते.


पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, निम्न वर्धा, निम्न पेढी पुनर्वसनातील कामांची गुणवत्ता निकृष्ट असल्याच्या तक्रारी येत आहेत. धारवाड येथील नागरी सुविधांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. तिथे दूषित पाण्याचा प्रश्न आहे. जलवाहिनीसाठी वापरलेले पाईप निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत. ही कामे करणाऱ्या एजन्सीला तत्काळ ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे. याठिकाणी  पाणीपुरवठा प्रश्न सर्वप्रथम सोडवावा. सिद्धवाडीतील काही घरांचे पुनर्वसन आवश्यक आहे. तसेच दुर्गवाडा येथील नागरी सुविधांची कामेही तत्काळ पूर्णत्वास न्यावीत. कुंड सर्जापूर येथेही मोठ्या तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून आवश्यक तिथे भेटी देऊन पाहणी करावी. आपण स्वतःही या कामांची पाहणी करू.  कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी यापुढे नियमित थर्ड पार्टी, सोशल ऑडिट करून घ्यावे. प्रशासनाकडूनही दर महिन्याला आढावा घेतला जाईल. असेही त्यांनी सांगितले.

असदपूर, शहापूर येथील कामांची पाहणीही आपण स्वतः करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या दर्जेदार पुनर्वसनासाठी वाढीव निधीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून कामे मार्गी लावावीत, असे श्री. जगताप यांनी सांगितले. प्रकल्प पुनर्वसित गावांमध्ये उपलब्ध निधीतून प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्ण करण्यात यावीत. उर्वरित कामासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले.

पूरग्रस्त पुनर्वसन आढावा

२००७ मधील पूरग्रस्तांच्या पुनवर्सनाचाही प्रश्न प्रलंबित आहे. त्यासाठी आवश्यक निधी आदी प्रक्रिया विहित वेळेत करून कामे पूर्ण करावीत, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प पुनर्वसनाबाबतही चर्चा झाली.

थोडे नवीन जरा जुने