कोकणाप्रमाणे भोर उपविभागात यापुढे गंजरोधी विजेचे खांब- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

 मुंबई, दि. ६ :  भोर विधानसभा मतदार संघातील (जि. पुणे) विजेच्या विविध समस्या तातडीने सोडविण्यात येतील. तसेच वेल्हा व मुळशी तालुक्यात पाऊस अधिक पडत असल्याने पोल गंजण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या डोंगरी भागाचा विचार करता कोकणाप्रमाणे गंजरोधी ‘जीआय’ पोल देण्यात यावे, असेही निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

 

मुंबई येथील महावितरणच्या मुख्यालयात भोर विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्न, नवीन उपकेंद्र व वीज यंत्रणेचे सक्षमीकरण आदी मुद्द्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार संग्राम थोपटे, महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांची प्रमुख उपस्थिती होती. तर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महापारेषणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे, सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व राजेंद्र पवार आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

भाटघर येथे १३२/३३ के.व्ही. क्षमतेचे तर भोर उपविभागामध्ये ३३/२२ के.व्ही. भोर व ३३/२२ न्हावी अशी दोन वीज उपकेंद्रे तातडीने कार्यान्वित होणे गरजेचे आहे. त्यापैकी न्हावी येथील उपकेंद्रासाठी जमीन अधिग्रहणाचे काम प्रगती पथावर असून भोर येथील उपकेंद्राकरिता जागा निश्चित करून त्याबाबतचा प्रस्ताव १५ दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना डॉ. नितीन राऊत यांनी बारामती परिमंडलच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या.

 

भोर तालुक्यामध्ये गंजलेले २५८ पोल बदलले असून ३५० पोलचे वेल्डिंग व मफिंग करून सक्षमीकरण केले आहे. उर्वरित १५० पोल तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच वाहिन्यांच्या नूतनीकरण व यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी ७.४१ कोटी रुपयांचा प्रस्ताव डोंगरी विकास योजने अंतर्गत तयार करण्यात आला आहे.

 

याशिवाय अतिभारित रोहित्रांची क्षमता वाढ करण्यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीला योजनेला गती देणे आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात व इतर विविध वीज प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी यावेळी दिले. तसेच प्रलंबित कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी केली. भोर उपविभागातील तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून आठवड्याभरात ती पूर्ण होईल, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

 

सध्या महावितरणचा भोर उपविभाग हा बारामती परिमंडलाच्या कार्यक्षेत्रात आहे. मात्र वीजग्राहकांच्या दृष्टीने हे गैरसोयीचे असल्याने भोर उपविभाग हा पुणे परिमंडलामध्ये समाविष्ट करावा अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी केली. याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी पुणे प्रादेशिक संचालकांना दिले.

थोडे नवीन जरा जुने