नंदुरबारमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम सर्वेक्षणात आढळले ११७ कोरोनाबाधित

 नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.१२ : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या आरोग्य सर्वेक्षण व जनजागृती मोहिमेअंतर्गत उपचारासाठी संदर्भित केलेल्या 1418 व्यक्तींपैकी 1205 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 117 कोरोना बाधित आढळले आहेत. या बाधित व्यक्तिंवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.सर्वेक्षणात आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील 3 लाख 66 हजार 641 घरांना भेटी दिल्या. एकूण  18 लाख 72 हजार लोकसंख्येपैकी 16 लाख 73 हजार नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. यात अक्कलकुवा 2 लाख 45 हजार, धडगाव 2 लाख 22 हजार, नंदुरबार 3 लाख 56 हजार, नवापूर  2 लाख 66 हजार, शहादा 4 लाख 12 हजार आणि तळोदा तालुक्यातील 1 लाख 70 हजार नागरिकांचा समावेश आहे.

सर्वेक्षण केलेल्या नागरिकांपैकी 7866 व्यक्तींना रक्तदाब, 159 कर्करोग, 5724 मधुमेह,  इतर आजार 1238 आणि 298 व्यक्तींना खोकला असल्याचे आढळून आले. हे सर्व अतिजोखिमीच्या गटात येत असल्याने त्याना खबरदारी घेण्याविषयी सांगण्यात आले. 274 व्यक्तींना ताप, 34 घसादुखी तर 72 व्यक्तींमध्ये एसपीओ-2 चे प्रमाण 95 पेक्षा कमी आढळले. या सर्वांपैकी 1418 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आणि यापैकी 85 टक्के व्यक्तिंची स्वॅब चाचणी करण्यात आली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, एएनएम, एमपीडब्ल्यु, स्वयंसेवक आदींनी सहभाग घेतला.

मोहिमेमुळे गाव पातळीपर्यंत कोरोनाविषयी जागृती होण्यास मदत झाली आहे. आरोग्य तपासणी व जनजागृतीमुळे नागरिकांच्या मनातले गैरसमज दूर झाले असून स्वॅब चाचणीसाठी नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. उर्वरीत नागरिकांचे सर्वेक्षण आणि ऑनलाईन नोंदणीचे काम त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत.

थोडे नवीन जरा जुने