धानखरेदी संदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व उपाययोजना करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

 मुंबई, दि 01: धानखरेदीसंदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात.  बारदानांच्या उपलब्धतेअभावी धानखरेदी विस्कळीत होणार नाही यादृष्टीने सर्व आवश्यक निर्णय त्वरित घेण्यात यावेत.  त्याचप्रमाणे ज्या राज्यांमध्ये धानखरेदीची प्रक्रिया सुलभ आहे,  त्याचा अभ्यास करुन त्याच धर्तीवर पुढील वर्षी आपल्या राज्यातही तशा खरेदी पद्धतीची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.



 

विधानभवन, येथे विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदीबाबत बैठक आयोजित करण्यात आली.  त्या बैठकीत धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासंदर्भात मुद्देनिहाय चर्चा झाली. तसेच धानखरेदी प्रक्रिया सुयोग्यरित्या पार पाडावी यासाठी करावयाच्या आवश्यक त्या उपाययोजना, मागील हंगामात धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळलेल्यांवर कारवाई, शेतकऱ्यांचे प्रलंबित चुकारे संदर्भात उद्धभवलेल्या तांत्रिक अडचणीचे निकारण करुन चुकाऱ्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करणे याबाबींवर चर्चा झाली.

 

धानखरेदी वेळेत न झाल्यास पावसामुळे व अन्य कारणामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते.   यावर्षीच्या धान खरेदी प्रसंगी खरेदी केंद्रांवर गर्दी होऊ नये, खरेदी-भरडई-गोदामात माल भरणे हे चक्र योग्य प्रकारे सुरु रहावे,  शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे खरेदी तारीख कळवणे इत्यादी  उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.  बारदानाचा तुडवडा असल्यास पी.पी. बॅगच्या पर्यायाचाही वापर करण्याबाबत निश्चित करण्यात आले.  सरकारची धान खरेदी योजना राबवितांना शेतऱ्यांचे हित प्राधान्याने जपले जाईल याची योजनेच्या यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंची आणि त्यांनी घाम गाळून केलेल्या कष्टाची जाणीव बाळगावी, असेही विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांनी सांगितले.

 

पारदर्शकपणे योजनेची अमलबजावणी व्हावी,  त्यात दलालांचा शिरकाव होऊ नये, वाढीव धान्य खरेदीचे आकडे दाखवून पैसे लाटण्याचे प्रकार बंद व्हावेत,  त्यासाठी प्रशासन आणि पोलीस यातील 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख समिती नेमावी असे आदेशही यावेळी देण्यात आले.

 

या बैठकीत अन्न व नागरी विभागाचे सचिव विलास पाटील, वित्त (व्यय) विभागाचे सचिव राजीव मित्तल, अन्न व नागरी पुरवठा विभागचे सह सचिव एम. एम. सूर्यवंशी, मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक प्रसाद ओक, व्यवस्थापकीय संचालक दिलीप हळदे, नाफेडचे शाखा व्यवस्थापक पुनीत सिंग,आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक जे. एस. राठोड तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने