कोरोना टाळण्यासाठी नागरिकांनी जीवनशैली बदलण्याची आवश्यकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


ठाणे : राज्यात कोरोनाचा आलेख उतरता असुन  रुग्णांची संख्या कमी होत आहेत हे चांगले लक्षण आहे परंतु जनतेने बेपर्वाई बाळगू नये. योग्य ती खबरदारी घ्यावी. प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलावी  आणि शासनाच्या  सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

 

मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या  हस्ते खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने झालेल्या ठाणे जिल्हयातील कल्याण  आर्ट गॅलरी येथील कोविड रुग्णालयाचा आणि  टिटवाळा येथील कोविड रुग्णालयाचे ई लोकार्पण झाले. या कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील,खासदार श्रीकांत शिंदे,आमदार विश्वनाथ भोईर, महापौर विनिता राणे, आयुक्त- कल्याण डोंबिवली डॉ. विजय सूर्यंवशी, मनपा लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,  इतर देशांमध्ये (साथीच्या रोगाचा) आजार वाढत असताना आपण सावध रहाणे आवश्यक आहे. राज्यातील महामारीची लाट आपण एकत्रितपणे रोखली पाहिजे.  दिवाळीच्या उत्सवात अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

 ठाणे जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे उल्लेखनीय काम झाले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व नागरी संस्थांचे कौतुक करुन यापुढे ही योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना मुख्यमंत्री यांनी केल्या.

थोडे नवीन जरा जुने