ऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


नंदुरबार  : नंदुरबार नगर परिषदेने उभारलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या माध्यमातून ऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी केले.

 नंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे ई-भूमीपूजन आणि स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई-लोकार्पण श्री.ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात झालेल्या  या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, मंजुळाताई गावीत, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी, आमशा पाडवी आदी उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले,जलतरण तलावाला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. त्यामुळे  या सुविधेच्या माध्यमातून सर्वोत्तम खेळाडू घडविण्याचे उद्दीष्ट ठेवावे. आंतरराष्ट्रीय पातळीवर  कामगिरी करणारे खेळाडू तयार करावेत. त्यासाठी  आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल.

आदर्श प्रशासकीय इमारत उभी करावी

नंदुरबार नगर परिषदेची प्रशासकीय इमारत सर्व सुविधांनी युक्त आणि  इतरांसमोर आदर्श ठरेल अशी बनवावी. इतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी इमारत बघण्यासाठी इथे यावेत. नगर परिषदेने शहारासाठी चांगल्या सुविधा तयार केल्या आहेत. 

ही शिरीषकुमारसारख्या  क्रांतीकारकांची भूमी आहे. इथल्या जनतेला सुविधा देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल. अशा सुविधांच्या माध्यमातून उत्तम नागरिक घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने